Saturday, 13 February 2016

मोरपिसं

भीति इतकीच असते की,
खुणा सापडतील.

दिसेलच ती नजरेतली चमक,
कदाचित बोलून जाईल ती नको ते.

सापडतील उमटलेले कैक शहारे
आणि ऐकू येतील
अस्फुट कुजबुजते
कित्येक हळवे शब्द

लक्ष जाईलच त्या विखुरलेल्या
पाठीवर अस्ताव्यस्त रुळणाऱ्या
खुल्या बटांकडे

सापडतील उधाणलेल्या
सुखाच्या शुभ्र लाटा
आणि तरारुन येईल एखाद्
चुटपुटता कोवळा व्रण

जाणवतील विझत आलेले
मऊ मुलायम, अधीर स्पर्श
आणि अजूनही सलगी करणाऱ्या
हळूवार बिलगणाऱ्या सावल्या

पुरवते मी तो भरभरून घेतलेला
खोलवर पोचलेला एकच एक
अनभिज्ञ श्वास
आणि हसते मान मागे टाकून
दिलखुलास, मुक्त, बेफ़िकीर.

सापडल्या बाकी शेकडो खुणा
तरी ती अंगभर पसरलेली
अनगिनत मोरपिसं,
ती तशीच राहतात.
अल्लद, तरल, मखमली आणि अव्यक्त.