पस्तीस वर्ष जुनं अपार्टमेंट.
सामान आधी थोडं होतं, ते आता अजून कमी होत आलंय. पडदे मधे एकदा धुवून आणून लावले होते, ते तसेच आहेत धुरकट, फिके झालेले. मोठी फ्रेन्चविंडो आहे ती शेवटची उघडल्याला युगं लोटली असतील. बाहेर पडलेले अनेक कागद, स्टेटमेंट्स, मॅगझीन्स, लेटर्स, बंद पडलेलं घड्याळ, कम्प्युटरच टेबल.
कोपऱ्यामधून वर्षानुवर्षीची धूळ. जळमटं. लाइटचं कनेक्शन जाऊन तर किती दिवस झाले.
दरवाजापासून आरशाच्या खोलीपर्यंत यायला वीस पावलं लागतात. थेट आत. अधेमध्ये न रेंगाळता.
एक दिवस तू सगळा पसारा दुसऱ्या खोलीत हलवलास. आवरायची वगैरे भानगड नाही. मोकळी चौकोनी प्रशस्त झाली ती रूम.
दोन्ही खिडक्यातून सोनेरी मंदसा उजेड चमकत असतो. आत शिरेल न शिरेल इतपत.
एक आरसा, पडद्याच्या रिंग्स, भिंतीत रोवलेले हुक्स एवढं सोडलं तर वर्तमान दुनियेशी संबंध दाखवेल असं
त्या खोलीत काहीही नाही.
मला तिथे त्या खोलीत आपला एक मोठ्ठा फोटो लावायचाय. फ्रेम करून. ब्लॅक अँड व्हाईट.
एक छोटं कॉफीमशीन विथ 2 मग्स. आपल्याला सारखी कॉफी लागते ना? गरम कडक आणि किंचित कडवट.
पाच सहा उशा हव्यात,
मऊमुलायम उबदार पांघरुणं हवीत.
अस्ताव्यस्त पसरायला. पायात पाय अडकवून. बोटं एकमेकांत गुंतवून.
बोलत राहू अखंड. माणसांबद्दल, कामाबद्दल, पैशाबद्दल, भूतकाळ आणि भविष्याबद्दल. आपण भेटलो त्याबद्दल. आठवून हसू.
तुझी पकड घट्ट होईल, अधिक घट्ट बिलगेन मी तुला. बाहेरचे आवाज आत यायचे थांबतील. त्या काळापुरते जगाला विसरून जाऊ आपण.
अडसर दूर होतील एकेक. हळूहळू.
काही श्वास रोखून घेऊ, काही उष्ण श्वासाचे आवाज खोलीत घुमतील. एरवी शांत शांत असणारी ती जागा मग आपल्या असण्यानी झळाळून उठेल.