Saturday, 29 October 2016

अनावृत्त

दुपारचं मऊ ऊन. बाहेर ऑक्टोबर हीट जाणवत असली तरी अपार्टमेंटवर सुखद गारवा.
उन्हाची तिरीप येत होती डोळ्यावर म्हणून कूस बदललीस तू. तुझ्या कुशीत साचलेल्या, हाताच्या विळख्यानी पडलेल्या उबदारपणातून मी थोडीशी अलग झाले.

त्या उबदारपणाची सवय झालीय इतकी की, तू जवळ असताना मला अंगावर पांघरूण घ्यावंस वाटत नाही. तूच पसरलेला असतोस अंगभर उभा-आडवा, व्यापून टाकलेलं असतंस.

अनावृत्त शरीराबद्दलचा काही आकस होता माझ्या मनात आधी, तो गळून पडला तुला भेटल्यानंतर.

सगळे आकार उकार उंच सखल जागा वळणं हे जणू नव्यानी समजलं मला.

पहिल्यांदा तुझ्या मिठीत शिरले होते ना, तेव्हाच कुठेतरी जाणवलं की हे माझं आहे, माझ्यासाठी आहे, वेगळं नाहीच. जसं की तू हा असाच असणार हे जणू माहितच होतं मला. तुझा स्पर्श असाच असेल, उबदार, आश्वासक.. .. रंग असाच असेल किंचित रापलेला.. .. चव अशीच असेल, ओठावर रेंगाळत राहणारी.. .. आणि तुझी नजर अशीच असेल, आतुर, उत्सुक, खूप बोलणारी. तू माझ्याकडे पाहावंस असं वाटतं मला, आणि पाहू नयेस असंही.
तू काहीसा राकट वागतोस आणि त्याचवेळी सौम्यही.

मी जे सगळं मनात बोलतच होते, तेवढ्यात तू वळलास, माझ्याभोवती पायांचा वेढा टाकलास. मी पाहिलं, तुझा चेहरा आपल्यातली एक उत्कट गोष्ट उघड सांगतो आहे.. अधिक प्रेमानं तुझ्या तरारून आलेल्या शिरेवर मी मूकपणे माझे ओठ फक्त टेकवले.